अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ यांनी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात मोठा वाद निर्माण झाला आहे. अशातच अनेक जेष्ठ नेते शरद पवारांना पाठिंबा देत असल्याचे समोर येत आहे. यातूनच येवल्याचे राष्ट्रवादीचे जुने नेते म्हणून ओळखले जाणारे माणिकराव शिंदे यांनी देखील पुन्हा पक्षात प्रवेश करत शरद पवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी विरोधात काम केल्यामुळे त्यांची राष्ट्रवादीतून 2019 साली हकालपट्टी झाली होती. मात्र छगन भुजबळ हेच पवारांच्या विरोधात गेल्याने शरद पवारांची भेट घेऊन शिंदे यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला आहे. शरद पवार लवकरच महाराष्ट्र दौरा करणार असून ह्या दौऱ्याची सुरुवात नाशिक (Nashik) जिल्ह्यापासून होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे 8 जुलै रोजी शरद पवार यांची उत्तर महाराष्ट्रातील पहिली सभा होणार आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्यासोबत गेलेले छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात ही सभा होणार असल्याने राष्ट्रवादीच्या बंडानंतर शरद पवारांचे पहिले टार्गेट छगन भुजबळ असणार हे या सभेच्या माध्यमातून निश्चित झाले आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात 8 जुलैला ही सभा होणार असून, येथील राष्ट्रवादीचे नेते ऍड. माणिकराव शिंदे यांनी पवारांची सिल्वर ओक येथे भेट घेतल्यानंतर येवल्याची सभा ठरल्याचे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान भुजबळांच्या विरोधात शरद पवार गटातून माणिकराव शिंदे यांना पुढे बळ दिले जाणार आहे.
(सहसंपादक – रोहन मोकळ)