जळगाव जामोद व संग्रामपुर परिसर पाण्याखाली
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने बुलढाणा जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे.तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असल्याने नदी नाल्यांना प्रचंड पूर आला. तालुक्यातील असंख्य गावातील नदीकाठच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांनी सुरक्षेसाठी आश्रय घेतला आहे. तसेच तालुक्यातील १४० गावांचा संपर्क तुटला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर, रुधाना, पंचाळा, उमरा, वडगाव वान, वानखेड बावनबिर, टूनकी, आलेवाडी, सोनाळा, एकलारा बानोदा, आदी गावांमध्ये नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. पूरामूळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बावनबिर येथील केदार नदी, आलेवाडी, टूनकी येथील नदी, सोनाळा येथील कचेरी नदी, लेंडी नाल्याला प्रचंड पूर आला असून दुथडी भरून वाहू लागले आहे.