बदलापूर रेल्वे प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊनच मुंबई आणि कर्जतच्या दिशेने प्रवास करावा लागत आहे. या ठिकाणी अर्ध्या-पाऊण तासानंतर असलेल्या रेल्वे गाडीमुळे बदलापुरात रेल्वे लोकल भरत असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत असून एकप्रकारे त्यांना जीवघेणा प्रवास येथील प्रवाशांना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. बदलापूर रेल्वे स्थानकातून पहाटे ३ वाजून ६ मिनिटांनी पहिली लोकल मुंबई दिशेला रवाना केली जाते. तर रात्री ११.३० वाजता शेवटची लोकल मुंबईला जाते. यादरम्यान बदलापूर ७६ गाड्या मुंबईकडे जातात. यातील काही गाड्या ठाणे तर काही गाड्या परेल स्थानकापर्यंत जातात. मात्र बदलापुरातील प्रवासी संख्येचा विचार करता या गाड्यांची संख्या नगण्य आहे. विशेष म्हणजे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस अर्ध्या ते पाऊण तासाच्या अंतराने लोकल गाड्या मुंबईत दिशेला सूटतात. यामुळे बदलापुरात राहणाऱ्या प्रवाशांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबई सीएसएमटीवरून बदलापूरकडे येणाऱ्या गाड्या मुंबई सीएसएमटी स्थानकातच पूर्णपणे भरून जातात. तर या गाड्या बदलापूरपर्यंत पूर्ण भरलेल्या असतात. भायखळा स्थानकात काही प्रवासी चढू शकतात. मात्र दादर रेल्वे स्थानकात प्रवाशांना गाडीत चढण्यासाठी आपल्या जीवाची बाजीच लावावी लागते तर त्यापुढे कुर्ला पाटकोपर, मुलुंड किवा ठाणे या स्थानकांवर बदलापूरच्या प्रवाशांना गाडीत चढणे अत्यंत जिकरीचे होते. त्यामुळे मुंबई सीएसएमटी स्थानकावरून बदलापूर दिशेकडे सुटणाऱ्या गाडांमध्ये बदलापूरकरांना घरी येण्यासाठी देखील मोठा संघर्ष करावा लागतो. घाटकोपर आणि ठाणे रेल्वे स्थानकात तर प्रवाशांना गाडीत चढण्यासाठी अनेक वेळा तासनतास लागतात. कारण दोन्हीकडून प्रवाशांचा मोठा ओघ दिसून येतो. अनेक जण प्रवासी बदलापुरात येण्यासाठी टप्प्याटप्प्याने प्रवास करतात. जी स्थिती परी परतताना आहे. तीच तिथे जाताना देखील आहे. बदलापुरातील अनेक प्रवाशांना डोंबिवली, ठाणे, घाटकोपर स्थानकांवर उतरताना तर धक्के खातच उतरावे लागते. तर प्रवाशांना वेळेतच गाडी सुटेल, याचीही शास्वती नसल्यामुळे अनेकदा प्रवाश्यांना लटकतच प्रवास करावा लागतो.
त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेतील बदलापूर मुंबई सीएसएमटीच्या दिशेने सुटणाऱ्या गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी बदलापुरातील रेल्वे प्रवासी करत आहेत. सध्या पाऊण तासांच्या गॅपनंतर गाड्या उपलब्ध आहेत. मात्र हा काळ कमी करून तो पंधरा मिनिटांपेक्षा कमी करावा, अशी मागणी आता प्रवाशांकडून करण्यात येत आहे.