26 नोव्हेंबरला संविधान दिनी राष्ट्रपती द्रोपर्दी मुर्मू यांच्या हस्ते घटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे. देशातील कोणत्याच न्यायालयाच्या प्रांगणात आंबेडकर यांचा पुतळा नाही. मात्र, आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात पुतळा विराजमान होणार आहे. हरियाणातील मानेसर इथं पुतळ्यांचं काम पूर्ण करण्यात आलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त, सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्यासह भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. 7 फूट उंचीच्या या पुतळ्यामध्ये डॉ. आंबेडकर यांनी वकिल पोशाख आणि हातात संविधानाची प्रत धारण केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात समोरच्या हिरवळीवर आणि बागेत डॉ. आंबेडकरांचा पुतळा बसवला जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध शिल्पकार नरेश कुमावत यांनी या पुतळ्याचे शिल्प केले आहे, जे सध्या हरियाणामध्ये याला फिनिशिंग टच देत आहेत. पुतळ्याचे व्यासपीठ सध्या जवळपास 50 मजुरांसह पूर्णत्वाकडे जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलात सध्या महात्मा गांधींचा एक पुतळा आहे. जो सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या समोर आहे. गेल्या वर्षी, तीन वकिलांनी भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात आंबेडकरांचा पुतळा बसवण्याची मागणी केली होती.
आंबेडकरी चळवळीशी ओळख असलेल्या वकिलांच्या गटाने केलेल्या सततच्या विनंतीमुळे डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये त्यांनी सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांना पत्र लिहून सुप्रीम कोर्टाच्या लॉनवर डॉ. आंबेडकरांचा पुतळा लावण्याची मागणी केली होती. यावर्षी सप्टेंबरमध्ये सुप्रीम कोर्ट आर्ग्युइंग कौन्सेल असोसिएशनने (SCACA) पुतळा बसवण्याची मागणीही केली होती.