मुंबई (दि. 29)
महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. त्यांना आवश्यक त्या सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय.एस. चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. एच. के. गोविंदराज, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, भिक्खू महासंघाचे अध्यक्ष डॉ. भदन्त राहुल बोधी महाथेरो, अविनाश महातेकर, रामभाऊ पंडागळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, गतवर्षी लाखो अनुयायी आले होते. त्यांची मुंबई महापालिका आणि सर्वच यंत्रणांनी उत्तम व्यवस्था केली होती. यंदाही आवश्यकता वाटल्यास आणि गतवर्षीच्या व्यवस्थेतील त्रुटी दूर करून जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. बेस्ट, एसटी यांची परिवहन व्यवस्था, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून तसेच पोलीस बंदोबस्त याबाबत चोख नियोजन करण्यात यावे. आरोग्य आणि स्वच्छता, साफ- सफाई याबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडली पाहिजे, यांची दक्षता घेण्यात यावी. अनुयायींची भोजन, निवास आणि आरोग्य सुविधांबाबतही मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या.