मांडवगण फराटा ता. शिरूर या ठिकाणी पूर्वीच्या गुन्ह्यातील आरोपी रामदास भानुदास पवार यास त्याच्या घरून अटक करण्यासाठी गेलेले सहा.फौजदार आर.बी कदम व पोलीस जमादार एस.पी. खबाले हे असरोपीस पकडत असताना आरोपीचा भाऊ रोहिदास उर्फ प्रकाश भानुदास पवार, भानुदास बॅरिस्टर पवार, व बायडाबाई भानुदास पवार यांनी रामदास पवार यास अटक करतेवेळी मज्जाव करून आरोपी अटक करण्यास गेलेल्या पोलिसांना धक्का बुक्की करत पोलिसांचे कपडे फाडून मोठा गोंधळ करून आरोपीस पळवून जाण्यास मदत केली. याबाबत मांडवगण मध्ये एकच खळबळ माजली असून संबंधितांवर आरोपीस तपासकामी अटक करण्यापासून मज्जाव करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, धक्काबुक्की, व शिवीगाळ प्रकरणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर घटना घडल्यानंतर शिरूर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.पी.यादव, पी.एस.आय अभिजित पवार व इतर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचा शोध घेतला असता कानगाव हद्दीतील कुरणामध्ये झाडाझुडुपांमध्ये लपून बसलेला आरोपी रोहिदास भानुदास पवार यास पोलिसांची चाहूल लागल्याने त्याने तेथून पळ काढला. परंतु पोलीसांनी त्याचा शिताफीने सिनेटाईल ने पाठलाग करून त्यास अटक केले व मा. न्यायालयासमोर हजर केले असता त्यास पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. सदरील घटनेतील फरार आरोपी रामदास भानुदास पवार, भानुदास बॅरिस्टर पवार, बायडाबाई भानुदास पवार यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असून त्यांना पकडण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.
अलीकडच्या काळामध्ये अवैध धंदा करणाऱ्यांना कमी कालावधी मध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे मिळत असल्यामुळे त्यांना कायद्याचा धाक राहिला नाही. ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना अपयश येत आहे. वरील घटनेतील गुन्हेगार हे सराईतपणे वारंवार दारू विक्री करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत आहेत तरीदेखील पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावर कठोर कारवाई का केली जात नाही हा एक सामान्य जनतेपुढे पडलेला प्रश्न आहे.
सदर घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप व साहयक पोलीस निरीक्षक संदीप यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय अभिजित पवार हे करत असून जर कोणास फरार आरोपींबद्दल माहिती मिळाली तर शिरूर पोलीस स्टेशन ला संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले.