धक्कादायक! जीवंतपणीच श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्याला दाखवले मयत… धक्याने वृद्धाचा मृत्यू!!
⬛भोकरदन तहसिल कार्यालयाचा संतापजनक कारभार
जालना,(दि.24)
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भोकरदन तालुक्यातील सिरसगाव मंडप येथील रहिवासी रामराव सुपडाजी सिरसाठ हे श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी होते. परंतु अलीकडे त्यांचे अनुदान बंद झाले होते. याबाबत त्यांनी भोकरदन तहसिल येथे चौकशी केली असता तहसिल दप्तरी त्यांची मयत नोंद केल्याचे आढळले.
जीवंतपणीच मयत नोंद केल्याने त्यांना याचा तीव्र धक्का बसला व ह्रदयविकाराच्या झटक्याने 25/11/2023 रोजी निधन झाल्याची माहिती सिरसाट कुटुंबियांनी दिली. यासंदर्भात त्यांची पत्नी सुभद्रा सिरसाट यांनी जिल्हाधिकारी जालना यांना भेटून तक्रार केली आहे. भोकरदन तहसिल येथील संबंधित कर्मचाऱ्यांनी कोणतीही शहानिशा न करता मयत नोंद केली व माझ्या पतीचे अनुदान बंद केले आहे. दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर मानहानी , मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी केली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी जालना यांनी सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश भोकरदन तहसिलदार यांना दिले आहेत.