मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र ठरविण्याच्या मागणीसाठी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याचिका केली होती. त्यावर ३१ जानेवारीपर्यंत निकाल देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला होता. या मुदतीत कामकाज पूर्ण होऊन आदेश देणे शक्य नसल्याने मुदतवाढ देण्याची अध्यक्षांची विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य करीत १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
शिवसेनेतील फुटीवर ३१ डिसेंबर तर राष्ट्रवादीतील फुटीवर ३१ जानेवारीपर्यंत निकाल देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकर यांना दिला होता. शिवसेनेतील फुटीवर निकालासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. याच धर्तीवर अध्यक्षांच्या वतीने राष्ट्रवादीच्या अपात्रतेच्या याचिकांवर निकाल देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदतवाढ देण्याची मागणी महान्याय अभिकर्ता तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाकडे केली. शिवसेनेच्या संदर्भात अलीकडेच दिलेल्या निकालाचा संदर्भ देण्यात आला. तसेच उलटतपासणी आणि सुनावणी ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. निकालपत्र तयार करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अध्यक्षांच्या वतीने करण्यात आली. शिवसेनेतील फुटीवर अध्यक्षांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने त्याला प्रत्युत्तर देण्यात अध्यक्षांचा बराच वेळ खर्च झाली. यामुळे राष्ट्रवादीतील सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. राष्ट्रवादीच्या वतीने युक्तिवाद करणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी अध्यक्षांना फक्त एक आठवड्याची मुदतवाढ द्यावी, अशी भूमिका मांडली.
➡️ या तारखेला ठरणार अपात्रतेचा अंतिम निर्णय
सर्वोच न्यायालयाने मुदतवाढ दिल्यानुसार 15 फेब्रुवारी च्या मुदतीत निकाल दिला जाईल.
-वि. अध्यक्ष राहुल नार्वेकर