नाशिक : सध्या चाललेल्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस दलामध्ये मोठ्या फेर बदल्यांचे सत्र सुरू आहे.याच पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांची पदोन्नतीने म्हणून पोलीस उपमहानिरीक्षक तथा अपर पोलीस आयुक्त पदावर मुंबईत तर, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर-पाटील यांची बदलीचे आदेश गृहविभागामार्फत जारी करण्यात आले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील पोलीस दलामध्ये बदल्यांचे सत्र सुरू आहे. त्यानुसार, गेल्या काही दिवसात पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्तांपासून ते उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर, गृहविभागाने बुधवारी (ता. ३१) राज्यातील अपर पोलीस महासंचालक ते पोलीस उपमहानिरीक्षक या पदांवरील सुमारे ६४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांची अपर पोलीस आयुक्त या पदावर पदोन्नतीने मुंबईतील विशेष शाखेत बदली झाली आहे. तर ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांची नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पदी बदली झाली आहे. देशमाने हे २०१२ ते १४ या दरम्यान नाशिक ग्रामीणला अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.त्याचप्रमाणे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर-पाटील यांचीही बदली झाली असून त्यांची पदस्थापना करण्यात आलेली नाही. तर, ठाणे शहराचे पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांची नाशिक परिक्षेत्रात नवीन विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली झाली आहे. कराळे यांनी यापूर्वी नाशिक शहर आयुक्तालयात उपायुक्त पद सांभाळले तर, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून देखील कार्यभार सांभाळलेला आहे. त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यात बदलीचे आदेश गृहविभागामार्फत जारी करण्यात आले आहेत.
सहसंपादक – रोहन मोकळ