नांदेड – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी असलेल्या जीएसटी कार्यालयाचे स्थलांतर इतरत्र कुठेही करुन कार्यालयाची संपूर्ण जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाकरीता देण्यात यावी या प्रलंबित असलेल्या तमाम आंबेडकरी जनतेच्या जिव्हाळ्याच्या आणि अस्मितेच्या प्रश्नी आत्ता आंबेडकरी संघटना ऍक्शन मोडवर आल्या असून माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या १२५ व्या पार्श्वभूमीवर एकदिवसीय निरंक लाक्षणिक उपोषण जिल्हाधिकारी कचेरीसमोर करणार असल्याची माहिती उपोषणकर्ते आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते कोंडदेव हाटकर, ज्येष्ठ पत्रकार जी.पी. मिसाळे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभू ढवळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुरेशी मोकळी जागा नसल्यामुळे आंबेडकरी अनुयायांची भीमजयंती, महापरिनिर्वाण दिन, धम्म चक्र प्रवर्तन दिन, महाविहार बावरीनगर धम्म परिषद अशावेळी अभिवादनासाठी भीम अनुयायांची खूपच गैरसोय होत असते, ही गैरसोय कायमची दूर व्हावी याकरीता आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी यापूर्वी वेळोवेळी निवेदने, धरणे धरुन शासनास जीएसटी भवन स्थलांतरीत करावे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे विस्तारीकरण करावे अशी एकमुखी मागणी केलेली आहे. परंतु या मागणीकडे अद्याप कोणीही लक्ष दिलेले नाही. महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीम जयंतीचा उत्सव अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे आणि त्यागमूर्ती माता रमाईचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष असल्याने या महत्त्वपूर्ण प्रश्नी शासन- प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि याबाबत त्वरीत कार्यवाही शासनाकडून व्हावी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.ना. अजित पवार, मा.ना. देंवेद्रजी फडणवीस यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. यावर तात्काळ कार्यवाही न झाल्यास महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती दिनापासून राज्यभर एल्गार पुकारण्यात येईल, असा निर्धार करण्यात आला आहे.
निवेदनात माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या १२५ व्या वर्षानिमित्त त्यांचा पूर्णाकृती पुतळा जीएसटी भवनच्या आवारात बसविण्यात यावा, व्हीआयपी रोडवरील तथागतांची मुर्ती बसविण्याचा ठराव नांदेड मनपाने दि. २८ फेब्रुवारी २००६ ला पारित केला. परंतु त्याची अद्याप जातीय द्वेष भावनेतून अंमलबजावणी झालेली नाही, ती करण्यात यावी आणि व्हीआयपी रोडवरील शासकीय गोदामाच्या जागेवर मनपाने नियोजित व्यापारी संकुल उभारल्यानंतर संकुलाच्या शेवटच्या मजल्यावर अंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व अभ्यास केंद्र उभारावे या अत्यंत महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या मागणीकडे शासन- प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कचेरीसमोर उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणास मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दर्शवावे असे आवाहन फुले- आंबेडकर विचारधाराचे जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ नेते एन.डी. गवळे, रिपब्लिकन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रमेश रामजी सोनाळे, ज्येष्ठ आंबेडकरी नेते तथा माजी जि.प. सदस्य दशरथराव लोहबंदे, दिगंबरराव मोरे, माजी नगरसेवक महेंद्र पिंपळे, संस्था संचालक प्रविण कुपटीकर, युवा नेते सत्यपाल सावंत, माजी अधिकारी एस.एम. बनसोडे, के.सी. आवटे, एम.डी. जोंधळे, किशनराव ढवळे डोंगरगावकर, ज्ञानोबा दुधमल, डॉ. एस.पी. ढवळे, बाबुराव गजभारे व स्थानिक महिला मंडळ आदींनी केले आहे.
ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः