नाशिक : सध्या राज्यात मान्सूनसाठी तीव्र स्वरूपातील विशेष कोणतेही पोषक वातावरणीय प्रणाली नसल्यामुळे नाशिकसह मराठवाडा, उत्तर व मध्य महाराष्ट्रात (दि.१४) शुक्रवारपासून पाच दिवस पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरणार असून तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस होईल. तर मुंबईसह कोकण व विदर्भात मान्सून पोहचलेल्या काही जिल्ह्यांत २० जूनपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
राज्यात मराठवाडा, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत १८ जूनपर्यंत पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होऊन तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. तसेच, मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गसह विदर्भातील काही जिल्ह्यांत २० जूनपर्यंत मध्यम पावसाची शक्यता आहे. दरम्यान, नाशिकमध्ये गुरुवारी दुपारनंतर २ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात गुरुवारी पडलेला विविध शहरांतील पाऊस:(सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) नाशिक २, अलिबाग ३, रत्नागिरी १९, महाबळेश्वर २६, सांगली १, सोलापूर ४. जेऊर ५, छत्रपती संभाजीनगर ३. जालना ४, नांदेड १