धर्माबाद (वार्ताहर) धर्माबाद शहर हे एक मोठी व्यापार पेठ म्हणून प्रसिद्ध आहे. धर्माबाद तालुक्यात छोट्या मोठ्या वाहनांची संख्या लक्षणीय आहे. धर्माबाद शहर व आसपासच्या परिसरातील खेडेपाडे तसेच लागूनच असलेल्या तेलंगणा राज्यातील अनेक गावांचा व्यापाराच्या माध्यमातून धर्माबादशी थेट संपर्क असल्यामुळे दररोज छोटी मोठी वाहने घेऊन नागरिक कामानिमित्त धर्माबादला येतात. धर्माबाद च्या मुख्य बाजारपेठेतील रस्ते अरुंद असल्यामुळे तसेच पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे वाहनधारकांना दुकानातील सामान खरेदी करण्यासाठी जाताना आपले वाहन रोडवरच उभे करावे लागते. त्यामुळे अनेक वेळा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो आहे. एकच पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रणासाठी नियुक्त असल्यामुळे व बाजारपेठेची व्याप्ती मोठी असल्यामुळे वाहतूक नियंत्रित ठेवणे एका पोलीस कर्मचाऱ्याला कठीण जात आहे. यापूर्वी पोलीस कर्मचारी माधव पाटील व शिवाजी सूर्यवंशी या जोडीने धर्माबादच्या बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावण्याचे काम अतिशय चोखपणे केले होते. लॉकडाऊनच्या काळात अतिशय प्रामाणिकपणे काम करून विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या तरुणांकडून व बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांकडून दंड आकारून लाखो रुपयांचा महसूल या पोलीस कर्मचाऱ्यांच्या जोडीने पोलीस विभागाला मिळवून दिला होता. त्यानंतर पोलीस कर्मचारी केंद्रे यांनाही वाहतूक नियंत्रणासाठी नियुक्त करण्यात आले होते. या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरातील वाहतुक चांगलीच नियंत्रणात आणली होती. सर्वच बाजारपेठ मुख्य रस्त्यावर असल्यामुळे शेती उपयोगी खते, बियाणे, पेस्टिसाइड, बँका, कापड दुकाने, किराणा सामानाची दुकाने, दवाखाने, सोन्या चांदीचे दुकाने, शाळा, जनरल स्टोअर्स यासह अनेक दुकाने मुख्य रस्त्यानेच आहेत परंतु रोड छोटे असल्यामुळे दुकानासमोर वाहने लावण्यासही जागा राहत नाही. वाहन रोडवर लावले तर इतर वाहनांना जाण्यासाठी त्रास होत आहे. परिणामी ‘ट्राफिक जामची’ समस्या वारंवार निर्माण होत आहे. ट्राफिक जामवर पर्याय म्हणून तत्कालीन पोलीस निरीक्षक भागवत जायभाये यांच्या कार्यकाळात सम-विषम पार्किंगची संकल्पना अमलात आणून पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली होती. धर्माबाद शहरातील छोट्या मोठ्या वाहनधारकांची संख्या, शेतकऱ्यांची शेतासाठी औषध खरेदीची लगबग व सणासुदीचे दिवस, शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्याच्या समस्या लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या दृष्टीने एक पोलीस कर्मचारी अपुरा पडत असल्यामुळे पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे साहेबांनी आणखी एक किंवा दोन पोलीस कर्मचाऱ्यांची वाहतूक नियंत्रणासाठी नियुक्ती करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.