धर्माबाद (वार्ताहर) तालुक्यातील अनेक गावच्या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून मनुर, संगम, विळेगाव, सायखेड ते जारिकोट, सायखेड ते रावधानोरा, करखेली रेल्वे स्टेशन ते करखेली गाव, तेलंगाना – महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले हासनाळी इत्यादी गावच्या रस्त्याची तर अक्षरशः चाळणी झाली आहे. तर काही गावच्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट पद्धतीचे झाल्यामुळे कमी कालावधीतच रस्ता उखडून जात आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींना समोर जावे लागत आहे.
तालुक्यातील मंगनाळी फाटा ते मंगनाळी गाव पर्यंतच्या रस्त्याचे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्यामुळे दि 14 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा मंगनाळी येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
धर्माबाद तालुक्यात एकूण 52 गावे आहेत. त्यापैकी अनेक गावचे रस्ते अतिशय खराब आहेत. मागील दहा वर्षापासून त्या रस्त्यांची अवस्था जैसे थे अशीच आहे. धर्माबाद व बिलोली तालुक्याच्या सीमेवर संगमेश्वर हे प्रसिद्ध देवस्थान आहे. श्रावण महिन्यामध्ये या देवस्थानाला अधिक महत्त्व प्राप्त होते. गोदावरी, मांजरा व हरिद्रा या तीन नद्यांचा संगम असलेल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र संगमेश्वर देवस्थानाला दोन्ही तालुक्यातील असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात परंतु दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तारेवरची कसरत करीत यावे लागते. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था या रस्त्याची असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यात पावसाचे पाणी जमा झाल्यामुळे अनेक वाहनधारकांचे अपघात रोज होत आहेत याकडे आमदार, खासदार किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही. संगम, मनुर या गावातील नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना धर्माबाद ला येण्यासाठी अनेक नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. तालुक्यातील रोडची अवस्था खराब झाल्यामुळे बरेच गावांमध्ये महामंडळाची बस अद्याप पर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने शाळेत यावे लागत आहे व विद्यार्थिनींना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
तालुक्यातील मंगनाळी येथील रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्यामुळे अवघे काही दिवसातच रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत सदरील रोडसाठी अंदाजे पावणे दोन कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आहे. पावणे दोन कोटीचा रोड केवळ दोन महिन्यात खराब झाल्यामुळे संबंधित गुत्तेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची मिलीभगत असल्यामुळे सदर रोडची गुणनियंत्रक यंत्रणेमार्फत चौकशी करून संबंधित गुत्तेदार व अधिकारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी या मागणी संदर्भात मंगनाळी ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 14 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. अवघ्या काही दिवसातच तालुक्यातील अनेक गावच्या रस्त्याची पुरती वाट लागली आहे या भ्रष्टाचारी वृत्तीला तालुक्यातील नागरिक कंटाळले असून आंदोलनाच्या तयारीत आहेत.
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी कोट्यावधीचा निधी धर्माबाद तालुक्यात विविध कामासाठी खर्च केला. परंतु ते काम गुणवत्तापूर्ण होत आहे का? याकडे मात्र सोईस्करपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे अनेक ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाची कामे झाली. आणि काही महिन्यातच नवीन केलेले रस्ते खराब झाल्या मुळे आमदार राजेश पवार यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. धर्माबाद तालुक्यात विकासाची गंगा उलटी तर वाहत नाही ना अशीही चर्चा सर्वसामान्यात होत आहे.