धर्माबाद (वार्ताहर) नांदेड जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या सभागृहात वैज्ञानिक जाणिवा प्रशिक्षण शिबिर दि.७ ऑक्टोबर रोजी घेण्यात आले. तालुक्यातील प्राथमिक व हायस्कूल विभागातील शिक्षक व शिक्षिका या शिबिरास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी आपले विचार व्यक्त केले आहे. शिबिराच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी एस.आर.मरकंटे हे होते. गटविकास अधिकारी प्रफुल तोटेवाड, अनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष तुलसीदास शिंदे. ते माजी जि. सचिव जी. पी. मिसाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
एक दिवसीय शिबिरात अंधश्रद्धेवरील गीत, वैज्ञानिक चमत्कार प्रयोग, श्रद्धा व अंधश्रद्धा यांतील फरक सांगून माधव बावगे सर पुढे म्हणाले, जगात कोणतीही घटना, किंवा चमत्कार आपोआप घडत नसतो तर त्या मागे कार्यकारण भाव असतो तो समजून घेणे महत्त्वाचे आहे. मुलांना या कार्यकारण भावाची जाणीव करून दिल्यास त्यांची चिकित्सक वृत्ती, संशोधन वृत्ती वाढते या कारणाने विद्यार्थी शास्त्रज्ञ बनू शकतात म्हणून बाल वयातील मुलांना वैज्ञानिक जाणीव करून देणे यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षणाचे आयोजन शिक्षण विभागाने केले आहे. चमत्कार व जादू नसते हे अनेक वैज्ञानिक प्रयोग करून सिद्ध करून दाखविले. यावेळी शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर दिले आहेत.
भारतीय संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्याची जाणीव अनिसचे जिल्हा समन्वयक डॉ. बालाजी कोम्पलवार यांनी उत्कृष्टपणे उदाहरणासह मांडणी केली आहे.
उपस्थित प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांना प्रमाणपत्र व जादूटोणा विरोधी कायद्याची चित्रमय पुस्तिका देण्यात आली आहे.
या शिबिरास विस्तार अधिकारी बी. डी. जाधव. केंद्रप्रमुख आबासाहेब उस्केलवार, केंद्रप्रमुख भगत, केंद्रप्रमुख संजय कदम चिकना, केंद्रप्रमुख एस. एन. माळगे, प्रा.आर.एम. साळी, प्रा. कु. विशाखा साळी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात पाण्याने दिवा पेटवून करण्यात आली. प्रास्ताविक गटशिक्षण अधिकारी आर. यम. मरकंटे यांनी केले. सुरेख सूत्रसंचाल व आभार विस्तार अधिकारी शिवकुमार पाटील बाळापूरकर यांनी केले आहे.