धर्माबाद (वार्ताहर) नांदेड लोकसभा पोटनिवडणूक मतदार संघाचे प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण व नायगाव विधानसभा मतदारसंघाचे डॉ. मिनलताई खतगावकर हे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार यांनी दि.५ नोव्हेंबर २०२४ रोजी धर्माबाद येथून प्रचारास सुरुवात केली आहे.
उमेदवारी अर्ज परत घेण्याचा दि. ४ नोव्हेंबर हि शेवटची तारीख होती. यापूर्वीच त्यांनी आपला मतदारसंघ पिंजून काढला होता. पक्षाची उमेदवारी अधिकृत जाहीर झाल्यानंतर मोठ्या जोमाने प्रचारास सुरुवात केली आहे.
नांदेड लोकसभा मतदार संघाचे खासदार कै. वसंतरावजी चव्हाण यांचे तीन महिन्यापूर्वी दुःखद निधन झाल्याने जागा रिक्त झाली होती त्या जागेची पोट निवडणूक विधानसभे सोबतच जाहीर केली आहे. खासदार कै. वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण यांना महाविकास आघाडीचे पुरस्कृत काँग्रेस उमेदवारी दिल्याने संपूर्ण मतदारसंघात सहानुभूतीची लाट आली आहे.
नायगाव विधानसभा मतदार संघ 89 या मतदारसंघातून माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉ. मिनलताई खतगावकर यांनी मोठ्या प्रयत्नाने महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळविली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत एकूण दहा उमेदवार रिंगणात आहेत.
धर्माबाद येथील काँग्रेस कार्यालयापासून दि.५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पायी प्रचार दौरा सुरू करण्यात आला. आडत व्यापारी आनंदराव पाटील शिंदे यांच्या कार्यालयात सर्व आडत व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली, तेथून फर्टीलायझर्स, किराणा, कापड, सराफा, मेडिकल्स अशा विविध असोसिएशनचे प्रमुख यांची भेट घेऊन मत देण्याची विनंती करण्यात आली आहे. यावेळी शेकडो कार्यकर्ते सोबत होते. धर्माबाद येथे स्फूर्त काँग्रेसमय वातावरण दिसून आले आहे.