धर्माबाद-(वार्ताहर) परभणी शहरांतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतीकात्मक असलेल्या प्रतिची विटंबना एका माथेफिरूने केली आहे, ही घटना लक्षात आल्यावर परभणी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेचा धर्माबाद शहरांमध्ये तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. या घटनेचा निषेध म्हणून दि. 12/12/2024 गुरुवार रोजी धर्माबाद कडकडीत बंद ठेवले असून तालुक्यातील भीम आर्मी, वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, सकल बौद्ध समाज, फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊ विचाराच्या अनुयायांचा बंद मध्ये सहभाग असून विटंबना झाल्यामुळे धर्माबाद येथील सर्व आंबेडकरी अनुयायाने परभणी येथील घटना जाहीर निषेध करत धर्माबाद शहर बंद ठेवून मोर्चा देखील काढण्यात आला असून आजच्या मोर्चाचा मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक फुलेनगर येथून, बसवन्ना हिल्स, रामनगर चौक, वाल्मिकी चौक, आंध्रा बसस्थानक, नरेंद्र चौक, नेहरू चौक, पोलीस ठाणे, पानसरे चौक, मेन रोड, मोंढा रोड, शिवाजी महाराज चौक, तहसील कार्यालय येथे सांगता करण्यात आली. भारतीय राज्यघटनेचा अवमान झाला असून सर्व भारतीय जनतेने निषेध करणे गरजेचे आहे. राज्यघटनेत देशातील सर्व जाती धर्माच्या घटकांना न्याय दिलेला आहे म्हणून देशाचे एकात्मता अबाधित आहे. जातीवादी मानसिकतेचा अज्ञानी जे नीच कृत्य केले आहे त्याच कठोर शासन झाले पाहिजे भविष्यात कोणत्याही महापुरुषांची विटंबना झाली नाही पाहिजे. महापुरुषांचे कार्य कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित नसते याचे प्रबोधन होणे काळाची गरज असून ज्या संविधानावर भारत देश चालतो त्याच संविधानाची महाराष्ट्रात विटंबना करण्यात येते ही खूप मोठी शोकांतिका आहे. झालेल्या ह्या घटनेबद्दल समस्त भीमसैनिक व अनुयायाच्या भावना दुखावले आहेत संविधानाच्या प्रतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकास परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तरी त्या समाजकंटकावर कठोरात कठोर कारवाई करून फाशी शिक्षा देण्यात यावी अशी समस्त भिम अनुयायी यांच्यावतीने मागणी करण्यात आली आहे. व त्या समाजकंटकाला असे कृत करण्यासाठी कोणी सांगितले आहे ह्याचा पण तपास करावा ह्यासाठी तालुक्यातील बौद्ध अनुयायी व सर्व धर्मातील संविधान प्रेमी लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून आवाहन केले आहे.