“
बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
प्राचीन काळात तलवारीच्या धाकावर जनमाणसात हुकूमत निर्माण करून,स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारे अनेक राजे होऊन गेले. पण सामान्यजनांच्या अंतःकरणावर तलवारीच्या नव्हे, तर विचार आणि कृतीच्या विश्वासावर अधिराज्य निर्माण करणारे सम्राट अशोकाच्या नंतर केवळ आणि केवळ एकच राजे होऊन गेले ते म्हणजे धर्मनिरपेक्ष कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजीराजे भोसले. छत्र म्हणजे आधारवड पती म्हणजे नवरा नसून,प्रमुख होय शिवाजी म्हणजे सर्वोच्च. म्हणजेच प्रत्येकाला शिवाजी राजे आपले कुटुंब प्रमुख वाटावेत.आपल्या कुटुंबातील ते सर्वोच्च वाटावेत, आपले येते आधारवड वाटावेत.म्हणून तर त्यांना छत्रपती संबोधल्या जाते. छत्रपती शिवाजीराजे म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे नव्हे,तर स्वकर्तृत्वाने मनगटाच्या ताकदीवर व भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी या विचार संस्काराने तलवारीच्या धारेवर व वैचारिक प्रगल्भतेवर राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या संस्कार छायेखाली ते राजे झाले होते. म्हणूनशिवाजीराजांचे राज्य प्रत्येक माणसाला स्वतःचे राज्य वाटत होतं. तो विश्वास शिवाजीराजांनी व राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊनी शहाजी राजे यांच्या कल्पकतेतून अतिशय नियोजनपूर्वक व आपले सर्वस्व पणाला लावून जनमानसात निर्माण केला. छत्रपती शिवाजी राजे हे धर्मनिरपेक्ष होते.म्हणूनच त्यांच्या सैन्यात अठरापगड जाती सोबत मुस्लिम सैन्याचाही प्रचंड प्रमाणात भरणा होता. ही धर्मनिरपेक्षता छत्रपती शिवाजी राजांना आपले आजोबा मालोजी भोसले यांच्याकडून मिळालेली होती. मालोजी भोसले यांनी सूफी संत शहाशरीफ यांच्या सन्माना प्रित्यर्थ आपल्या मुलांची नावे शहाजी आणि शरीफजी ठेवली होती. म्हणून तर छत्रपती शिवाजी राजे हे एका जातीचे किंवा धर्माचे न राहता ते धर्मनिरपेक्ष ठरतात. पण ब-याचदा छत्रपती शिवाजीराजे सांगताना ते आपापल्या सोयीचे सांगितले जातात. विशेषतः बहुतेक वेळा ते मुस्लिम विरोधी होते असेच बिंबविले जाते.19 फेब्रुवारी 1630 ला पुणे येथे शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी राजांचा जन्म झाला .राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या संस्कारावर तर शहाजीराजे भोसले यांच्या कार्यकर्तृत्वावर शिवाजी राजे,रयतेचे राजे म्हणून जनसामान्यांच्या हृदयसिंहासनावर आरुढ होत होते. स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवर अनेक स्वकियांचा विरोध असूनही राज्य निर्माण करणे हे साधारण काम नव्हते. शिवाजी राजे केवळ अफजलखान वधापूर्ते किंवा शाहिस्तेखानाच्या कापलेल्या बोटांपुरते अनेक वेळा सांगितले जातात.पण त्याहीपुढे जाऊन आजच्या शासन व प्रशासनाला मार्गदर्शक ठरेल, तरुणांना प्रेरणादायी वाटेल, महिलांना सुरक्षित वाटेल, शेतकऱ्यांना आधारवड वाटेल, व्यापाऱ्यांना दिशादर्शक ठरेल, मुस्लिम आणि हिंदूंना सर्वधर्म सहिष्णू वाटेल असे अतिशय प्रत्येक क्षेत्रात व्यापक कार्य छत्रपती शिवाजी राजांनी केले. म्हणून प्राचीन काळापासून तर संगणक युगापर्यंत शिवाजी हे नाव आजही सर्व जाती धर्मातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदय मंदिरात कोरलेले आहे. असे गाव नाही जिथे शिवाजी राजांचे नाव नाही. शिवाजीराजांच्या 31 अंगरक्षकांपैकी 10अंगरक्षक मुस्लिम होते .तर बाकी अंगरक्षक मराठा, माळी ,धनगर ,रामोशी ,मातंग ,महार, आगरी, वंजारी ,कोळी इत्यादी अठरापगड जातीतील होते. अंगरक्षक काय करू शकतात हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या झालेल्या हत्त्येवरून सगळ्या जगाने अनुभवले. म्हणून शिवाजीराजांना एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित करणे म्हणजे शिवाजीराजांवर अन्याय करण्यासारखेच आहे .कोणत्याही महापुरुषाला जात नसते. हे विश्वची माझे घरं या संत वचनाप्रमाणे छत्रपती शिवाजी राजांचे दैदिप्यमान कार्यकर्तृत्व भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे .म्हणून भारतात जरी नसले तरी जगातील अनेक विद्यापीठांमध्ये शिवाजी राजे राष्ट्राची गरज म्हणून शिकवले जातात. भारतामध्ये फक्त महाराष्ट्र राज्यात इयत्ता चौथीच्या इतिहासात शिवाजी राजे दिसतात. वास्तविक शालेय स्तरावर प्रत्येक वर्गाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी राजांच्या एका एका पैलूचा अभ्यास करता येईल एवढे त्यांचे कार्यकर्तृत्व दिशादर्शक व प्रेरणादायी आहे. स्वराज्याच्या राजधानीसाठी त्यांनी जेव्हा रायगडाची निर्मिती केली तेव्हा या रायगडावर पूजेसाठी त्यांनी जसे जगदीश्वराचे मंदिर बांधले.तसेच आपल्या महालाच्या समोर मुस्लिम सैन्यासाठी त्यांनी मशीदही बांधली. अफजलखानाचा वध केल्यानंतर त्यांनी मुस्लिम रितीरिवाजानुसार अफजलखानाच्या प्रेताचे अंतिम संस्कार केले.व प्रताप गडाच्या पायथ्याशी अफजल खानाची कबर बांधून कायमस्वरूपी दिवाबत्तीची व्यवस्था केली. अफजलखानाच्या मुलांना धक्काही न लावता कोणताही दगाफटका न करता, मानसन्मानाने त्यांची रवानगी केली. अफजलखान वधाच्या प्रसंगात अफजलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने शिवाजीराजांवर पहिला वार केला. कृष्णा कुलकर्णीचा हा वार जीवाजी महालेने पलटून लावला म्हणून होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी असे म्हणतात. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करतो ?असे म्हणत मनुस्मृति वर पहिला हल्ला करत कृष्णाजीला सुद्धा चांगलीच अद्दल घडवली. तेव्हा सिद्धी इब्राहिम हे शिवाजीराजांचे अंगरक्षक होते . तर रुस्तुमे जमानने राजांना वाघ नखे उपलब्ध करून दिली ,ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता. तीच कबर आज आम्ही उखडून टाकण्याची भाषा करतोय .खरंच आम्हाला शिवाजी महाराज समजले का?आदिलशाहीत 1679 साली विजापुरला मोठा दुष्काळ पडला. तेव्हा आदिलशहाच्या दरबारात 10,000 ज्वारीचे पोते पाठवून त्यांची दुष्काळाची समस्या सोडवली. ही छत्रपती शिवाजी राजांची सर्वधर्मसहिष्णुता होती. तर दुसरीकडे महिलांवर अत्याचार करणाऱ्या बाबाजी गुजरला त्यांनी ठार मारले होते. सिद्धी हलाल शिवरायांच्या घोडदळात सेनापती होते. शिवाजी राजे पन्हाळा येथे अडकले असताना,सिद्धी हलाल ने सिद्धी जोहर सोबत निकराचा लढा दिला. 17 ऑगस्ट 1663 ला आग्र्याच्या सुटके प्रसंगी हिरोजी फर्जद ने शिवाजी राजांचा पोषाख परिधान करून मदारी मेहतर च्या सोबत आपली जान पणाला लावली.म्हणून अशा निष्ठावान मित्राला राजांनी स्वराज्यातील उच्चपद घेण्याचा आग्रह केला.तेव्हा मदारीने विनम्रपणे नकार दिला.आणि सिंहासनावरची चादर बदलण्याचे काम स्वीकारले. याला म्हणतात राजा प्रती असलेली निष्ठा.काझी हैदर हे शिवरायांचे 1670 ते 73 मध्ये वकील होते. खाजगी सचिव होते ,फारसी पत्रलेखनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. संत तुकाराम संत मौनी बाबा, संत याकूत हे शिवरायांना मोलाचे मार्गदर्शन करत असत.छत्रपती शिवाजी राजांचे जगातील पहिले चित्र रेखाटणारे पहिले चित्रकार मीर महंमद यांनी शिवाजीराजांचे चित्र जर रेखाटले नसते तर आज आपल्याला छत्रपती शिवाजी राजांचे खरे चित्र उपलब्ध झाले नसते. अशा छत्रपती शिवाजी राजांच्या कार्यकर्तृत्वाच्या परिघात आज एका विशिष्ट जातीच्या स्त्रियांना कधी सुल्ली डील्स, कधी बुल्ली बाईस सारख्या ॲपच्या माध्यमातून टार्गेट केले जाते. हिजाब च्या नावाखाली शाळेत प्रवेश नाकारला जातो. हे जागतिकीकरण स्वीकारलेल्या प्रगल्भ भारतासाठी अत्यंत चिंताजनक आहे. हिजाब घालून का होईना?परंतु मुस्लीम मुली शिकतात. तशी त्यांच्या शिक्षणाची परिस्थिती अतिशय बिकट आहे. एक तर शिक्षणाची संधीच मिळत नाही. हिजाब वरून जर त्यांना शिक्षण नाकारलं जात असेल,तर याला जबाबदार कोण धरावं?असच एकदा एका नवव्या इयत्तेत शिकत असणाऱ्या मुस्लिम मुलीचा फोन आला. सर मुझे पढना है!लेकिन मेरे पिताजी मेरी शादी करना चाहते है!प्लीज आप उनके साथ बात करो..! और मुझे स्कूल मे भेजने का बोलो..!अशा कितीतरी मुली आपल्या अवतीभवती आपल्याला डोळे असतील तर दिसतील. अशा मुली शिक्षणापासून वंचित राहत असतील,तर याला जबाबदार कोण?स्वतंत्र भारतात संविधान लागू झाल्यापासून ज्या ज्या संस्था शासनाचे अनुदान घेतात.त्या त्या संस्थात एका विशिष्ट कोणत्याही धर्माचा प्रचार किंवा प्रसार करता येत नाही. असे असतानाही धर्मनिरपेक्ष भारत देशात शासकीय कार्यालयात गाडगेबाबांनी सांगितल्यानंतर सुद्धा विशिष्ट पूजा होतातच ,शाळांमध्ये विशिष्ट धर्माचं ध्रुवीकरण करणारे कार्यक्रम होतात, भारताला भारत न म्हणता असंवैधानिक शब्दांचा वापर करतात . मग हे सर्व चालत असताना हिजाब प्रकरणावरून देशात का एवढा गदारोळ होत आहे. एखाद्या मुस्लीम मुलीला हिजाब वरून टार्गेट करणं धर्मनिरपेक्ष भारतात अशोभनीय आहे. कुणी काय घालावं, काय पूजावं , हा ज्याचा त्याचा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. जो केवळ फक्त संविधानात नसून तो संविधानात छत्रपती शिवाजीराजांसारख्या थोर महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वातुन आलेला आहे. भारताला महासत्ता बनवायचे असेल तर तो आपण मोठ्या मनाने हा बदल स्वीकारला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी राजांच्या जयंतीचे सार्थक होईल.”छत्रपती शिवाजी राजे डोक्यावर घेतल्या पेक्षा शिवाजीराजे डोक्यात घेऊन, आपल्या धडावर आपले शीर ठेवून छ. शिवाजीराजांना अपेक्षित असलेला धर्मनिरपेक्ष, सुसंस्कृत ,सृजनशील भारत निर्माण करूया. हि.रा.गवई.अ.भा.म.सा.प.जिल्हा सल्लागारश्री शिवाजी हायस्कूल इसोली. ता. चिखली जि. बुलढाणा ७३८७६५१५१४