छत्रपती ते घटनापती समता मार्च ने दिला समतेचा संदेश इंडियन स्पीकर्स फोरम व संविधान प्रचारक लोकचळवळीचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांना अभिवादन करून त्यांचा एकतेच्या विचारांचा जागर करण्यासाठी १८ मार्च २०२३ ला छत्रपती ते घटनापती समता मार्च हा तरुणाईच्या पुढाकाराने, दिव्यांग, अकोलेकर, विद्यार्थी, व इतर संघटनाच्या सोबतीने आयोजन करण्यात आले होते. २० मार्च १९२७ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चा सत्याग्रह केला. पण त्या अगोदर १८ मार्च १९२७ ला बाबासाहेब हे रायगडावर मुक्कामी होते. त्यांनी शिवरायांचा समतावादी वैचारिक वारसा पुढे चालविण्यासाठी महाडच्या सत्याग्रहातून देशामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी रायगड ते महाड असा समता मार्च तेव्हा बाबासाहेबांनी काढला होता. आणि तोच धागा पकडून आज अकोला येथे “छत्रपती ते घटनापती समता मार्च” चे आयोजन इंडियन स्पीकर्स फोरम व संविधान प्रचारक लोकचळवळ व इतर संघटनाच्या सोबतीने केले. कसा होता “छत्रपती ते घटनापती समता मार्च”? सायंकाळी ०५:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन, हारअर्पण व सामूहिक अभिवादन करण्यात आले. छत्रपतींच्या राजमुद्रेचे व संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून मार्च ला सुरुवात झाली. तरुणाई, विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक, दीव्यांग बांधव तसेच अकोलेकरांनी मोठ्या उत्साहात, सिटी कोतवाली – बस स्थानक मार्गे अशोक वाटिकेच्या दिशेने पायी मार्गक्रमण करत महापुरुषांच्या नावाचा व समतेच्या विचारांचा जागर करत मार्च अशोक वाटिका येथे पोचला. डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, गौतम बुद्ध च्या पुतळ्याचे पूजन व हारअर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले. मनोगत व्यक्त करतांना अक्षय राऊत म्हणाले की या आज समाजाला दोन्ही महापुरुषांच्या विचारांची गरज आहे. शोषित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी छत्रपतींनी समतेचे स्वराज्य निर्माण केले आणि तीच समता बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिली. संविधान प्रचारक आकाश पवार यांनी संविधान सर्वांसाठी आहे संविधानाचे पालन करणे आणि इतरांना संविधान सांगून समता प्रस्थापित करण्यासाठी कार्य करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. तेव्हा भारतीय बौध्द महासभेचे पी. जे. वानखेडे, शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, साथ सेवक फाऊंडेशन चे अंकुश इंगळे, छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान चे गौरव डोंगरे, गाडगे बाबा प्रतिष्ठान चे रोहन बुंदेले, युवास्फुर्ती फाऊंडेशन चे विकास जाधव, तरंग फाऊंडेशन व इतर ही संघटनांनी सहभाग घेतला. तसेच मार्च यशस्वी होण्यासाठी गौरी सरोदे, शेखर साबळे, रश्मी गावंडे, अजय कवडे, पवन मंगळे, सार्थक राऊत, पूजा सोनोने, रोहित जगताप, अथर्व सरोदे यांनी कष्ट घेतले. राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.