शिरुर तालुक्यातील आंबळे गावात दि. ५ मे २०२३ रोजी महापुरुषांची संयुक्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.सकाळी ७ वाजता पंचशील ध्वजारोहण करण्यात आले.तद्नंतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करून त्रिशरण पंचशील घेऊन वंदना घेण्यात आली.सकाळी विद्यार्थीच्या निबंध स्पर्धा,हस्ताक्षर स्पर्धा,सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आल्या.उपस्थित विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली.
सायंकाळी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.यामध्ये महिलांनी भिमगितांच्या व बुद्ध गीतांच्या तालावर लेझिमचे प्रात्यक्षिक प्रदर्शन केले.हे या मिरवणुकीचे आकर्षण ठरले .सायंकाळी प्रबोधनपर विचारमंथन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ; यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष .ॲड वैभव चौधरी यानी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की हा माझा आयुष्यातला खूप महत्त्वाचा क्षण होता. मी बुद्ध वाचले, त्यांची विपश्यना साधना केली परंतु बुद्ध पौर्णिमेत कधी सहभागी झालो नाही. ही माझ्या आयुष्यातली पहिली बुद्ध पौर्णिमा होती. बुद्धाची आणि माझी ओळख ही आत्ता चार पाच वर्षा पुर्वीची. या आधी मला बुद्धा बद्दल काही माहीत न्हवतं किंवा ते जाणून घ्यायची गरज कधी वाटली नाही. जन्माने मराठा समाजात जन्माला आलो परंतु माझ्या घरातल्या देव्हाऱ्यात कधी बुद्ध न्हवता, आमच्यात बुद्धाला पूजणारं, त्याला मानणारे कोणी न्हवतं त्यामुळे बुद्ध मला कधी जवळचा किंवा महत्वाचा वाटलाच नाही. पण माझ्या सुदैवाने कॉलेज जीवनात माझ्या विचारणांना कलाटणी देणारी माणसं मला मिळाली त्यामुळे बुद्धाचा माझ्या आयुष्यात प्रेवेश झाला. बुद्धांच्या बद्दल जाणून घ्यायच्या नादात जे मिळेल ते वाचले जसे बुद्धाला समजून घेता येईल तसे समजून घेतले पण अजून प्रवास खूप बाकी आहे. आत्ताशी चार पाऊले त्याच्या दिशेने पडली आहेत. काल कार्यक्रमानिमित्त एक गोष्ट जाणवली की आमच्या लोकांना बुद्ध अजून आपला वाटत नाही. बुद्ध त्याच्या बंधू भावाच्या प्रेमाच्या शिकवणीमुळे साता समुद्रापार जाऊन जगभर पसरला पण स्वतःच्याच देशात जात मानसिकतेमुळे तो वाड्यावरच राहिला.या वरून हे स्पष्ट होते की भारत परकीयांशी युद्ध लढला पण त्याच्या अंतर्गत असणाऱ्या जातीची लढाई त्याला लढायची बाकी आहे. ही लढाई भारत आजवर जेवढ्या लढाई लढला त्यापेक्षा खूप मोठी लढाई आहे. ती लढाई लढण्यासासाठी भारताला खूप मोठं मानसिक बळ लागणार आहे. कारण ही लढाई मानसिकतेशी आहे आणि ती लढाई लढण्यासाठी प्रत्येक नागरिकाला त्यात सहभागी व्हावा लागणार आहे. हळूहळू काळाच्या ओघाने काही गोष्टीत बदल घडणार आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत.कालचा अनुभव खूप छान होता सगळी आपलीच माणसे आहेत परंतु व्यवस्थेने त्यांच्यावर अत्याचार केले. जी व्यवस्था एखाद्याला त्याच्या जन्मावरून श्रेष्ठ कनिष्ठ ठरवत असेल ती व्यवस्था संपूर्ण मुळापासून उपटून टाकण्याच्या लायकीची आहे. अशाप्रकारे आपले मनोगत व्यक्त केल. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदर्श सरपंच मा.श्री.सोमनाथ आण्णा बेंद्रे हे होते.क्रांती संघटनेच्या अध्यक्षा सुनीताताई भोसले यांनी यावेळी मार्गदर्शन केलेत. यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान केला.मंथन परिक्षेत महाराष्ट्र राज्यात तिसरा क्रमांक पटकविलेला विद्यार्थी प्रज्वल संतोष भालेराव यांचा यथोचित सन्मान मंडळाच्या वतीने शाल,श्रीफळ,गुलाबपुष्प देऊन सरपंच मा.श्री.सोमनाथ आण्णा बेंद्रे यांच्याकडून ११०० रुपयांचे रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी सुनीताताई भोसले,सरपंच श्री.सोमनाथ बेंद्रे, ॲड .श्री.वैभव चौधरी,संतोष भालेरावसर,तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश नाना बेंद्रे व विद्यमान उपसरपंच प्रदीप ठोंबरे,दूध-डेरिचे चेअरमन संजय बापू बेंद्रे, नितीन बेंद्रे,ग्रामसेवक श्री.भाउसाहेब करपे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील झेंडे यांनी केले.तर रूषिकेश झेंडे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.यावेळी गावातील तरुण,ज्येष्ठमहीला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.