नातेवाईक चार दिवसांपासून मृतदेहाजवळ न्यायाच्या प्रतीक्षेत
अजूनही संबंधितांवर कार्यवाही नाही आरोग्य विभाग व पोलिसांचे डोळे झाक करून हातावर हात……..!!
बहिष्कृत भारत डिजिटल मिडिया
नांदेड –
शासकीय वैद्यकीय परिचार्या प्रशिक्षण केंद्र नांदेड येथे शिकत असलेल्या प्रजापती लांडगे ह्या मुलीला साधा ताप आला व तेथेच उपचारादरम्यान चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे रक्ताच्या उलट्या होऊन तिचा मृत्यू झाला. हा उपचार शिकाऊ डॉक्टरच्या हाताने केल्यामुळे सदरील मुलीचा मृत्यू झाला आहे , असे नातेवाइकानचे म्हणणे आहे. मृत्यूचे कारण स्पष्ट न होऊ देण्यासाठी तातडीने पोस्टमार्टम करून मृतदेह रफादफा करण्याचा प्रयत्न संबंधित आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी केलेला आहे , सदरील मयत प्रजापती ही अत्यंत निरोगी होती व ती शिकाऊ उमेदवार होती. ती गुरुगोविंद सिंग महाविद्यालय येथे परिचारिका कोर्स (जीएनएम) च्या वर्गात शिकत होती.
दिनांक 18 -5 -2023 च्या रोजी प्रजापतीला साधारण ताप आला व उपचारासाठी तिला शंकरराव चव्हाण रुग्णालय विष्णुपुरी, नांदेड येथे त्याच दिवशी नेण्यात आले. तेथे उपस्थित शिकाऊ डॉक्टरने तिला चुकीचे इंजेक्शन दिले, ह्या इंजेक्शनमुळे तिला अन्दाजे 15 ते 20 रक्ताच्या उलट्या झाल्या व ह्यातच रक्ताच्या उलट्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे प्रजापतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा तातडीने दाखल करण्यात यावा व संबंधितांवर लवकरात लवकर कार्यवाही करून त्यांना अटक करण्यात यावी , या अटळ मागणीमुळे मयतेच्या नातेवाईकांनी चार दिवसांपासून मृतदेह ताब्यात न घेता केवळ न्यायाच्या प्रतीक्षेत शंकरराव चव्हाण रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे मृतदेहासोबत ताटकळत बसलेले आहेत.
अनेक राजकीय पक्षांच्या व इतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मयतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन विचारपूस केलेली आहे ,परंतु प्रशासनाकडून अद्यापही कसल्याही प्रकारची दखल न घेता या मयतच्या मृतदेहाकडे केवळ कानाडोळा केला जात आहे. मयत भगिनी ही बौद्ध आणि मागास जातीची असल्यामुळे सदर प्रकरणाची कोणत्याही पातळीवर गंभीर द्खल घेतल्या जात नाही व हा त्यांच्यावर अन्याय आहे, असे नातेवाईकांचे म्हणणे असून सदरील मृतदेह व नातेवाईक केवळ न्यायाच्या प्रतीक्षेत चार दिवसांपासून ताटकळत बसले आहेत .
सदर प्रकरणावर नांदेड प्रशासन काय कार्यवाही करेल किंवा करेलच की नाही ? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत असून आरोपी आरोग्य विभाग हा निश्चित आहे. व पोलीस प्रशासन हातावर हात ठेवून प्रकरणाचा सांगोपांग खेळ पाहत आहे. परंतु सदरील बौद्ध मयत प्रजापतीला न्याय मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, ही शेवटची ठाम भूमिका घेऊन नातेवाईक न्यायाच्या प्रतीक्षेत डोळे उघडून आणि केवल आशेवर शंकरराव चव्हाण रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे बसले आहेत…..