राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद हॉल येथे काल पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील परिस्थिती बाबत टिप्पणी करत केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र हे शांतता प्रिय राज्य असूनही गेल्या काही काळापासून येथे सातत्याने दंगली भडकावल्या जात आहेत. जिथे सत्ताधारी पक्षाची ताकद नाही, तिथं जाणीवपूर्वक दंगली निर्माण केल्याचा प्रयत्न केला जातोय, असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केल्याने राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.पवार म्हणाले की, गेल्या काही महिन्यात अकोला,अमळनेर,कोल्हापूर अशा शहरात दंगली झाल्या आहेत. सत्ताधारी पक्षाची ताकद जिथं नाही, जिथं विरोधक मजबूत आहेत, तिथं असे प्रकार सूरू आहेत. राज्यकर्त्याची जबाबदारी आहे की सर्वसामान्य नागरिकांना संरक्षण देणे. मात्र दंगलींना खतपाणी घालण्याचे उद्योग सुरू आहेत. राज्यात २३ जानेवारी २०२३ ते २३ मे २०२३ या कालावधीत ३ हजार १५२ मुली आणि महिला बेपत्ता झालेल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात राज्यातून महिला तसेच मुली बेपत्ता होत असतील, तर राज्यकर्ते काय करत आहेत? असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.