- •सोलापूर येथे दोन नाट्यगृह उभारणार
सोलापूर (दि.27) :- नाटकांनी आणि लोककलेने मराठी संस्कृती जिवंत ठेवली आहे. लोककला टिकल्या तरच मराठी संस्कृती टिकणार आहे. नाट्यगृह हे संस्कृतीचे केंद्र असून, नाटकांनी मराठी संस्कृती जिवंत ठेवली आहे. शासनाने नाट्य संस्कृतील प्रोत्साहन दिले असून,यासाठी मराठी नाट्यसृष्टीला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्याचे पालकमंत्री तथा उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सगितले.
शतक महोत्सवी आखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थिती आमदार सुभाष देशमुख, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले,सिने अभिनेते मोहन जोशी, सिने कलाकार सविता मलपेकर, रिंकू राजगुरू, प्रा. शिवाजी सावंत, प्रा.बी.पी रोंगे, कार्याध्यक्ष प्रकाश यलगुलवार, सहकार्याध्यक्ष राजा माने, प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंके , कोषाध्यक्ष दिलीप कोरके तसेच नाट्य रसिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, नाट्य संमेलनाला गौरवशाली परंपरा असून शतक महोत्सवी आखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य सोलापूरात होत आहे. नाट्य संमेलनाच्या माध्यमातून नाट्य चळवळीला गती मिळते. या चळवळीला व्यापक रूप देण्यासाठी विविध क्षेत्रातील कलाकारांसह पडद्यामागील कलाकारांचादेखील मोलाचा वाटा आहे. या सर्वांचे प्रतिनिधित्व अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात पाहायला मिळते. सांस्कृतिक क्षेत्राची परंपरा नाट्य संमेलनाने जपली आहे. सोलापूरला 100 ते 150 वर्ष नाटकांची परंपरा असून, मराठी, कन्नड, तेलगू, उर्दू अशा विविध भाषेतील विविध नाटके अनेक रंगमचावर सादर झाली आहेत. सोलापूर येथे नाट्यगृह उभारणीसाठी 10 कोटी निधीची तरतूद केली असून, 1400 आसन क्षमतेचे एकच नाट्यगृह उभारण्यापेक्षा 600 ते 700 आसन क्षमतेची दोन नाट्यगृह उभारण्यात येतील. नाट्यगृह उत्कृष्ट पध्दतीचे व्हावे यासाठी नाट्य संमेलन परिषद पदाधिकाऱ्यांच्या सूचनांचा विचार केला जाईल. तसेच देणगीदारदेखील नाट्य चवळवळीला प्रोत्साहन देत असून,लोकसहभागातून नाट्य संमेलनाला मोठी आर्थिक मदत मिळाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल म्हणाले संवाद हा नाट्यसंहितेचा महत्त्वाचा घटक आहे. संवादाशिवाय नाटके उभी राहू शकत नाहीत. संवाद ही नाटकाची प्रचंड ताकद आहे. संवाद हा फार महत्त्वाचा असून माणसा- माणसातील, प्रांता- प्रांतातील, जाती- धर्मातील, देशा- देशातील संवाद विसरता कामा नये. सध्या नाटकाची जगाला गरज असल्याचे सांगून, सोलापूर येथे एकच जास्त आसन क्षमतेचे नाट्यगृह उभारण्यापेक्षा कमी आसन क्षमतेचे दोन नाट्यगृह उभारावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली .
नाट्य संस्कृती तळागाळापर्यंत पोहोचवणे ही अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची जबाबदारी आहे. मराठी नाट्य संस्कृती महाराष्ट्रात रुजवण्यासाठी एकांकी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी नाट्यगृह असून, काही नाट्यगृह चालू आहेत तर काही नाट्यगृह बंद अवस्थेत आहेत. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन नाट्यगृहाचा पुनर्विकास करावा ज्या ठिकाणी नाट्यगृह नाहीत त्या ठिकाणी नव्याने नाट्यगृह तयार करावेत. शासनाने मराठी नाट्यसृष्टीला पायाभूत सुविधा दिल्या असताना कलाकारांनी उत्तम कलाकृती सादर करावी. नाट्य रसिकांनी पुढच्या पिढीला नाटकाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितले.
यावेळी शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील तसेच प्रशासनाचे मोठ्या प्रमाणात सहकार्य झाल्याचे प्रस्ताविकात कार्याध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी सांगितले.
प्रारंभी पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते नटराज पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार हस्ते करण्यात आला.