मांडवगण फराटा : प्रतिनिधी
मांडवगण फराटा या ठिकाणी बालविवाह मुक्त भारत दिनानिमित्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती शिरूर व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वतीने बालविवाह मुक्त भारत कँडल मार्च काढून एक सामाजिक संदेश देण्यात आला. लग्न लागायच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो. भारतात वधूचे वय १८ आणि वराचे २१ पेक्षा कमी असू नये असे कायदा सांगतो. पुर्वी काही समाजात मूल जन्माला यायच्या आधीच त्याचे आपल्या नात्यात लग्न ठरवून टाकले जात, तशा शपथा जातीच्या पंचांसमोर घेतल्या जात असे, आजही काही प्रमाणात असे प्रकार होतानी अढळून येतात.
बालविवाह झालेल्या मुलींचा लैंगिक विकास पुरेसा झालेला नसतो. अशा स्थितीत १८ वर्ष गाठायच्या आतच त्यांना गर्भधारणा झाली तर बाळाच्या पोषणासाठी अजिबातच सक्षम नसलेले शरीर, घरातल्या कामाचे ओझे आणि त्यातच अपुरे पोषण या साऱ्यांचे वाईट परिणाम त्या बाळाच्या आरोग्यावर झाल्याखेरीज राहात नाहीत. बालविवाह हा कायद्याने गुन्हा तर आहेच पण आजच्या काळात हे असे घडणे म्हणजेच नवीन विचार शक्तीला काळिमा आहे. म्हणूनच एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पंचायत समिती शिरूर व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वतीने बालविवाह मुक्त दिनानिमित्त कँडल मार्च काढून व प्रतिज्ञा घेऊन सामाजिक संदेश देण्यात आला. यावेळी माजी सरपंच सुमनताई गायकवाड, अंगणवाडी सेविका व मदतनीस सुनीता परदेशी, सविता राठोड, अलका मोरे, वनिता सोनवणे, अनिता सावंत, लता खोमणे आदी उपस्थित होते.