मांडवगण फराटा ता.शिरूर दि (23) या गावातून जाणारा आंधळगाव तांदळी हा रस्ता वरदविनायक हॉस्पिटल ते तुकाई माता मंदिरापर्यंतचा रस्ता पावसामुळे व अवजड वाहनांमुळे अतिशय खराब झाला आहे. वाहनचालकांना वाहने चालवताना कोणता खड्डा हुकवू अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सदरील रस्त्यावरचा पूर्णपणे डांबर आच्छादित रस्ता उखडून गेला असून मोठमोठे खड्डे आणि रस्त्यावरील उखडलेले दगड रस्त्यावर असल्याने वाहनचालकांना, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना कसरत करावी लागत आहे. रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य पसरले असून रस्त्यावरील दगडे वाहनांच्या टायर खाली येऊन ते दगड रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला बंदुकीच्या गोळी प्रमाणे फेकले जातात त्यातून खूप मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मांडवगण फराटा हे गाव शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील मोठे गाव असून या गावामध्ये मोठ मोठे महाविद्यालये आहेत त्यामुळे विध्यार्थ्यांची संख्या खूप मोठी असून सदरील रस्त्यावरून विद्यार्थ्यांची ये जा असते. त्यामुळे सदरच्या खराब रस्त्यामुळे व रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने अनेकवेळा विद्यार्थी घसरून देखील पडले आहेत आणि दुसऱ्या वाहनांमुळे चिखल देखील विध्यार्थ्यांच्या अंगावर पडलेल्या घटना या अगोदर घडल्या आहेत. लवकरच साखर कारखाने चालू होणार असल्याने या रस्त्यावरून ऊस वाहतूक होणार आहे. परंतु रस्त्यावर खूप मोठे खड्डे असल्याने ऊस वाहतूक करणारे वाहने खड्यांमुळे पलटी होऊ शकतात. 2022 ला सदर रस्त्याची मंजुरी येऊन टेंडर देखील निघाले परंतु सरकार बदलल्याने कामास स्थगिती आली. सततच्या बदलत्या सरकारमुळे सामान्य जनता मात्र त्रस्त असल्याचे चित्र दिसत आहे.