धर्माबाद (वार्ताहर) येथील संविधान नगरात बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे वाचन समारोप कार्यक्रमात धम्मदेशना देताना पूज्य भदंत सुगत बोधी यांनी संदेश दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. पी. मिसाळे (माजी जि. उपाध्यक्ष भा.बौ.महासभा नांदेड) हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ता.अध्यक्ष सदानंद देवके, जयंती मंडळाचे अध्यक्ष गौतम लोखंडे हे उपस्थित होते.
धम्मदेशना देताना भंते सुगत बोधी यांनी तथागत गौतम बुद्धाने सांगितलेले विचार म्हणजेच बौद्ध धम्म असून त्यांनी दुःखाचे मूळ कारण शोधून दुःख नाहीसे करण्यासाठी चार आर्य सत्य व अष्टांग मार्गाने दुःख नाहीसे करता येते असा मोलाचा संदेश देऊन पुढे म्हणाले बौद्ध धम्म हा विज्ञाननिष्ठा असून डॉ. बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. कर्मकांड, अंधश्रद्धा, काल्पनिक गोष्टीवर आधारलेल्या गोष्टीवर खर्च न करता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञाची माहिती देऊन याचे पालन करीत असल्याने बौद्ध समाज सुखी होत आहे असे मौलिक विचार मांडले.
बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन वर्षावासाच्या काळात माधव वाघमारे कांगठीकर यांनी केल्याने संविधान नगराच्या वतीने सपत्नीक सन्मान करण्यात आला. तसेच अशोक ढवळे यांची हिवताप कर्मचारी पतपेढी नांदेड अध्यक्षपदी चौथ्यांदा निवड झाल्याबद्दल तसेच गौतम कैवारे यांची आरोग्य पर्यवेक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल जयंती मंडळाच्या वतीने शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कु.आरोही जवारे, कु. चक्षु, कु. सोनल लोखंडे, कु.प्रज्ञा रामटेक्के, अनिकेत लोखंडे, कु. निशीला, कु.प्रीती कांबळे, कु.संगीता रामटेक्के, कु.स्वाती धोत्रे, कु.आश्विनी वाघमारे यांची अभ्यासू भाषणे झाली.
यावेळी सदानंद देवके, सुभाष कांबळे, कवी कांबळे जिगळेकर यांनी आपले विचार मांडले. अध्यक्ष जी.पी. मिसाळे यांच्या भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. भाषणाच्या कार्यक्रमानंतर महाराष्ट्राची प्रसिद्ध गायिका क्रांती डोपे यांचा भीम गीतांचा दणदणीत कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमास कवी बी. एम. हातोडे, ऍडओकेट गंगाधर कांबळे, राष्ट्रपाल वाघमारे नांदेड, चंद्रकांत देवके, शेषराव धावणे, पत्रकार सुदर्शन वाघमारे, निलेश वाघमारे, चैतन्य घाटे, शंकरराव सोनटक्के, लालबा वाघमारे चिरली, पत्रकार धम्मप्रकाश जवारे, व महिला मंडळाची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम कैवारे व अशोक ढवळे यांनी केले तर आभार माधव कांगठीकर यांनी मानले.