चौकशी करून कारवाई करावी अन्यथा उपोषण
सुरक्षित मातृत्वाबाबत आरोग्य विभागाकडून अनेक योजना राबविल्या जातात. त्यात जननी सुरक्षा योजना, मातृत्व अनुदान योजना, याशिवाय मानव सेवा कार्यक्रमांतर्गत बुडीत मजुरी योजनाही प्रभावीपणे राबविण्यात येतात. परंतू उदय नगर प्रा. उप केंद्राच्या माध्यमातून गर्भवतींची नोंदणी करण्यात अनियमीतपणा करण्यात आलेला आहे. माता गरोदर असताना आठव्या व नवव्या महिन्याच्या तसेच प्रसूती झाल्यावर एका महिन्याच्या आत महिलाना धनादेश वाटप करणे बंधनकारक आहे. परंतू उदय नगर येथील प्रा. आरोग्य उपकेंद्रामध्ये भरपूर २८ गावे संलग्न असून गरोदर माता आरोग्य विभागाच्या अनुदान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. या प्रकरणाबाबत संबंधित प्रा. आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्री राजपूत साहेब यांचे सोबत सविस्तर चर्चा करून प्रकरणाची गंभीरता लक्षात आणून दिलेली आहे.परंतू बोटावर मोजण्याइतक्या लाभार्थ्याना लाभ मिळालेला आहे व इतर लाभार्थ्याचा लाभ गेला कुठे? आरोग्य सेविका, आशा सेविका यांच्या कामचुकारपणामुळे लाभार्थ्याच्या अर्जामध्ये चुका झाल्या असल्यामुळे लाभार्थ्याना अनुदान मिळालेले नाही, असे दिसून येते. तरी आपण या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा २०/३/२०२३रोजी उपोषण करण्यात येईल अशी मागणी मुकेश भंडारे यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.