अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरीच्या संशयावरुन ४ दलीत तरुणांना अमानुष मारहाण करण्यात आली आहे. सध्या या चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत अधिक मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. शेळी चोरीच्या संशयावरून या तरुणांना अमानुष मारहाण करण्यात आली आहे. अतिशय निर्दयीपणे या तरुणांना झाडाला उलटे लटकवण्यात आले होते.नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी काल दिवसभर या चारही तरुणांना झाडाला उलटे लटकवत ठेवले. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर लघुशंका केली. तरुणांसोबत अमानवीय कृत्य झाल्याने श्रीरामपूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. या मारहाणीत शुभम वाघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड आणी खंडागळे हे तरूण जबर जखमी झाले आहे. या तरुणांना श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पीटलमध्ये दाखल केलं आहे. दरम्यान आरोपींना त्वरीत अटक करा अशी मागणी तरुणांच्या कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी दलित संघटनांनी आवाज उठवायला सुरूवात केली असून,आरोपींचा तपास पोलिस घेत आहेत. तर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये तरूणांना झाडाला उलटं लटकावलेलं दिसत आहे. या घटनेनंतर अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
झाडाला उलटं लटकावून मारहाण _ फोटो