सोलापूर दि. 24 : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्याविरुद्ध एका मागासवर्गीय तरुणाच्या मृत्यूबद्दल अकलूज पोलीस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला आहे. या तरुणास मोहिते-पाटील यांच्यासह त्यांच्या आठ साथीदारांनी केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. यापैकी दोघांना अटक झाली असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत झाली आहे. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यासह इतरांचा पोलीस शोध घेत आहेत.
मृत तरूण मागासवर्गीय असल्यामुळे या गुन्ह्यात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांची वाढ होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे. धवलसिंह मोहिते-पाटील हे दिवंगत माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे आहेत.
अभिजित उत्तम केंगार (वय २१, रा. वाघोली, ता. माळशिरस) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार धवलसिंह मोहिते-पाटील (वय ४५) यांच्यासह गिरझणी गावचे माजी सरपंच सतीश संभाजी पालकर (वय ५२) व माजी सदस्य मयूर नवनाथ माने (वय ३३), हिरा रामचंद्र खंडागळे (वय ३०, अकलूज) आणि इतर चार साथीदारांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (भारतीय दंड संहिता कलम ३०४,३२४, ३४) दाखल झाला आहे. यातील सतीश पालकर व मयुर माने यांना अटक झाली असता त्यांना २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
केंगार हा गेल्या १८ जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या बंगल्यात शिरला. तो चोरी करण्याच्या हेतूने बंगल्यात शिरल्याच्या संशयावरून त्याला पकडून बेदम मारहाण झाली. या मारहाणीत तो बेशुध्द पडल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.