रिक्त पदांनुसार यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात
पुणे,(दि. 24):बहुचर्चित तलाठी परीक्षेतील गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. राज्यातील आदिवासीबहुल जिल्हे वगळता उर्वरित २३ जिल्ह्यांतील रिक्त पदांनुसार जात संवर्गाप्रमाणे उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनापासून (२६ जानेवारी) पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्याचे नियोजन भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात आले आहे.
तलाठी भरती परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यांत ५७ सत्रांमध्ये घेण्यात आली. या परीक्षेत तलाठी पदासाठी राज्यभरातून १० लाख ४१ हजार ७१३ परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते. यापैकी आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षेची उत्तरसूची प्रकाशित करून उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसुचीबाबत काही आक्षेप, हरकती असल्यास त्या नोंदविण्यासाठी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मुदत देण्यात आली होती. संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी दोन हजार ८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांकडून नोंदविण्यात आले होते. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले नऊ हजार ०७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरविण्यात आले. त्यानुसार सामान्यीकरण पद्धतीने परीक्षेमध्ये ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाल्याचे दिसून आले.
दरम्यान, परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसह राजकीय संघटनांनी केले आहेत. मात्र, हे आरोप, दावे फेटाळत भूमी अभिलेख विभागाने गुणवत्ता यादीनंतर यशस्वी उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले. ते काम अंतिम टप्प्यात असून आदिवासी जिल्ह्यांमधील ‘पेसा’ अंतर्गत रिक्त जागा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उर्वरित जिल्ह्यांमधील रिक्त पदे भरली जाणार आहेत, असे भूमी अभिलेख विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे निवड यादीसाठी जिल्हा निवड मंडळाची मदत घेऊन या याद्यांमध्ये जिल्ह्यातील रिक्त पदांचा विचार करण्यात येत आहे. ही रिक्त पदे भरताना जात संवर्गानुसार यादी अंतिम करण्यात येत आहे.
“तलाठी भरती परीक्षेतील गुणवत्ता जाहीर करण्यात आली आहे. जिह्यातील जातनिहाय आरक्षण आणि रिक्त जागांची संख्या लक्षात घेऊन अनुसूचित क्षेत्र (पेसा कायदा) १३ जिल्हे वगळून इतर २३ जिल्ह्यांतील जागांबाबतचे नियुक्तीपत्र उमेदवारांना देण्याची कार्यवाही २६ जानेवारीपासून करण्याचे नियोजन आहे.”
- – सरिता नरके, अप्पर जमाबंदी आयुक्त, तलाठी परीक्षा राज्य समन्वयक