सातारा (दि. 24) :- ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगार यांना राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री-Multipurpose Artificial Insemination Worker in Rural India (MAITRI) म्हणुन प्रशिक्षण दयावयाचे आहे व प्रशिक्षीत व्यक्तिची कृत्रिम रेतन व अनुषंगीक कार्य करण्यासाठी नियुक्ती करावयाची आहे, जेणेकरुन राज्यातील गायी-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाची व्याप्ती वाढेल व ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगार यांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच त्यायोगे दुग्धउत्पादनात वाढ होवुन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम हा तीन महिने कालावधीचा असून यामध्ये एक महिना क्लासरुम ट्रेनिंग व दोन महिने प्रॅक्टीकल ट्रेनिंग चा समावेश राहील. क्लासरुम ट्रेनिंग पशुवैदयकीय महाविदयालयामध्ये आयोजीत करण्यात येईल व प्रॅक्टीकल ट्रेनिंग जिल्ह्यातील पशुवैदयकीय दवाखाना श्रेणी-१ किंवा तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय किंवा जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय या ठिकाणी घेण्यात येईल.
सदर प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जदार हा किमान १२ वी उत्तीर्ण झालेला असावा, त्याचे वय १८ ते ३५ वर्ष असावे. अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध होईल.
सातारा जिल्हयातील इच्छुक उमेदवारांची सदर प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे, तरी इच्छुक उमेदवारांनी नजीकच्या पशुवैदयकीय दवाखान्यामार्फत पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांचेकडे अर्ज सादर करण्याबाबत डॉ, दिनकर बोर्डे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सातारा व डॉ. विनोद पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद, सातारा यांनी आवाहन केले आहे.