धर्माबाद (गजानन वाघमारे) –
येथून जवळच असलेल्या धर्माबाद तालुक्यातील बाभळी फाटा येथे दि.३ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास बारामती होऊन बिलोली-धर्माबाद मार्गे निजामाबाद कडे फळे घेऊन जाणाऱ्या पिकप वाहनाचा अपघात झाला आहे. गत दोन दिवसात याच ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने व वळण रस्त्यावर सुरक्षित कठडे करण्यात आले नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की बारामतीहून बिलोली-धर्माबाद मार्गे निजामबाद कडे फळे घेऊन जाणारा पिकअप क्रमांक टिएस १६ युडी ११२६ हा दि.३ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता बाभळी फाटा येथे आले असता बाभळी फाटा येथे दिशादर्शक फलक नसल्याने व वळण रस्त्यावर सुरक्षित कठडे नसल्याने चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला पिकअप पलटी होऊन झालेल्या अपघातात पिकअप वाहनातील द्राक्ष,सफरचंद,डाळिंब,बोर, अन्नार. अशा फळांचे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. गत दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी तेलंगणा मधील वरंगल येथे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात होऊन पाच म्हशी दगावल्या होत्या.
बिलोली ते धर्माबाद या राज्य महामार्गाचे काम के.टी.कन्स्ट्रक्शन या कंपनीने केले असून सदरील काम थातूरमातूर व निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. कुंडलवाडी ते धर्माबाद १४ किलोमीटर रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी अर्धवट काम सोडण्यात आले आहे. वळण रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्याने दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. गोदावरी नदीवरील डांबरीकरणही के.टी. कन्स्ट्रक्शन कडून करण्यात आले नाही. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गोदावरी नदीवरील रखडलेले डांबरीकरण करण्याबरोबरच वळण रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यासाठी के.टी. कन्स्ट्रक्शन कंपनीला आदेशित करावे अशी मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे.