दि.11/6/2023
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी धारणगाव शिवारातील गोदावरी नदीवरील पुलावरुन अज्ञाताने 15 दिवसीय नवजात अर्भक नायलॉन कापडी पिशवीत भरुन गोदावरी नदीपात्रात फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. सदर बालकाच्या डोक्याला मार लागून त्याच्या नाकातोंडातून रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर नवजात बालकाच्या मृतदेहाचा पंचनामा करत सदर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
हे नवजात बालक जिवंत असताना नदीपात्रता फेकल्याचा अंदाज आता व्यक्त केला जात आहे. दरम्यान घटनास्थळी तालुका पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, उपनिरीक्षक महेश कुसारे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करत आहे.